Monday 26 September 2016

स्वातंत्रोत्तर ग्रामीण अर्थकारणाची निष्पत्ती -> उध्वस्त भारत. या स्पष्ट निष्कर्षाप्रत येणे आवश्यक

मराठा आंदोलन असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा

आमचे मित्र प्रताप आसबे. ज्येष्ठ पत्रकार. युवक क्रांती दलातील सहकरी. पुरोगामी-लोकशाही -समाजवादी विचारांचे. त्यांचे मराठा आंदोलनाचे विस्तृत विश्लेषण या लेखात आले आहे. उध्वस्त ग्रामीण भारताचे त्यांनी चपखल चित्रण केले आहे. एकीकडे भासमान असे ऐश्वर्य, राजकीय ताकद, सुबत्ता आणि प्रत्यक्षात बकाली, दारिद्र्य, अविद्या, कुंठा, याचेही त्यांना भान आहे. त्यांची समाजवादाची विचारांची चौकट या प्रश्नाची, विरोधाभासाची आर्थिक बाजू समजून घेण्यास अपुरी पडते आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था आणि आत्महत्या यास जागतिकीकरण जबाबदार आहे असे ते मांडतात. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर ग्रामीण आर्थिक पुनर्रचना करण्यात आलेले अपयश आणि कमकुवत होत जाणारी लोकशाही, ही नेहरू-महालनोबीस अर्थकारणाची अपत्ये ग्रामीण भारताच्या उध्वस्त होण्याची कारणे आहेत आणि त्यावर उपाय केल्याखेरीज ह्या समस्या सुटणार नाहीत. या स्पष्ट निष्कर्षाप्रत येणे आवश्यक आहे.